संपादकीय...
आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी?
स्वामी विवेकानंद
यांच्या मतानुसार ज्ञान हे बाहेरून येत नसून ते आतच असते. त्या ज्ञानाची जाणीव
करून देणे म्हणजे शिक्षण. ज्ञानाची जाणीव करून देणारा तो ‘शिक्षक’.
शिक्षणातून काय
साध्य करायचे आहे? विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? आदर्श शिक्षण पद्धती कशी
असावी? हे लक्षात घेतल्याशिवाय उत्कृष्ठ शिक्षक निर्माण होणे शक्य नाही.
ज्ञान देणारा, त्या
ज्ञानाचे अनुभवात रुपांतर करणारा, जीवनात उपयोगी पडणारे शहाणपण शिकविणारा शिक्षक
अभावानेच पाहायला मिळतो. शालेय जीवनातील शिक्षण हे जीवन जगताना कसे वापरावे? हे
शिक्षकाच्या ध्यानीही नसते.
शिक्षणाचा मुख्य
उद्देश संस्काराचे बीज रोपण करणे हा आहे. निरीक्षण, अनुभव, अभ्यास हे शिक्षणाचे
तीन आधारस्तंभ आहेत. निरीक्षण करून विचार करण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण
व्हायला हवी. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे कारण प्रश्न पडल्याशिवाय
आपण विचार करीत नाही आणि विचार केल्याशिवाय प्रश्न पडत नाही म्हणून
विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याकडे शिक्षकांनी लक्ष
दयायला हवे. आपला विद्यार्थी अधिक प्रश्न विचारू लागला तर शिक्षकाला आनंद झाला
पाहिजे. पण सद्या प्रत्यक्षात वर्गात असे घडते का?
शिक्षकाने
उत्कृष्टतेचा ध्यास, नवीन शिकण्याची आवड, भरपूर वाचन, श्रवण, मनन करायला हवे.
उत्तुंगतेची आस आणि जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद शिक्षकात हवा.
दररोज चाळीस मिनिटे पाठ्यपुस्तकातील माहितीचा पुरवठा करणे, पाठ्यपुस्तकापुरता शिक्षक, विषयापुरता शिक्षक हा दृष्टीकोन आता बदलायला हवा. नव नवीन तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा उपयोग शिक्षकांनी आपल्या शिकविण्याच्या प्रक्रियेत केला पाहिजे. मोबाइल, विविध शैक्षणिक अॅप, प्रोजेक्टर, पेन ड्राइव्ह, स्मार्ट टीव्ही इत्यादी अनेक साधने शिक्षकांना हाताळता यायला हवे. ‘माझे फक्त २-४ वर्षे राहिलेत.. मी आता कश्याला शिकू?’ ‘मी फक्त माझा विषय शिकवेन’ ही वृत्ती शिक्षकांनी आता सोडायला हवी. विद्यार्थ्यांना माहिती पुरविणारा शिक्षक स्वत:ला आदर्श शिक्षक समजतो, हेच या देशाचे दुर्दैव आहे...?
संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
