संपादकीय...
जीवनाचा खरा मार्ग...
फक्त शिक्षण मिळवून किंवा
डिग्रीचा कागद मिळाला की देश सुधारत नाही तर आपल्या नसानसातून, धमन्यांमधून
माणुसकी,
आपुलकी
आणि सौजन्य दिसून यावे. सहा आकडी पगार मिळाला की फक्त एक कुटुंब सुखी होईल पण
माझ्यासोबत माझा प्रत्येक भारतीय मित्र सुखी झाला किंवा सुखी व्हावा म्हणून आपण
हातभार लावला तरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सार्थक होईल.
आजही देशसीमेवर सैनिक डोळ्यांत प्राण आणून आपले रक्षण करत आहेत. त्यांनी कोत्या विचारांनी आपले रक्षण करणे बंद केले तर! तर काय होईल याचे कल्पनाही करवत नाही. देशाच्या शत्रूचा सहजच देशात प्रवेश होईल. मग स्वातंत्र्य कसे अबाधित राहणार! सगळीकडे अंदाधुंदी माजेल. देशाचा पोशिंदा शेतकरी दिवस-रात्र काळ्यामातीत राबत असतो. आपल्यासाठी धान्य, फळं, भाज्या पिकवित असतो. शेतकऱ्याने आपल्यापुरतेच धान्य पिकविण्याचे ठरविले तर सारा देशच उपाशी राहील. अन्नधान्य मिळणे दुरापास्त होईल. म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने केला तरच आणि त्यादृष्टीने प्रयत्न केला तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल. देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याचे, साक्षर झाल्याचे सार्थक होईल. स्वार्थी वृत्तीचा त्याग करून निरपेक्षपणे कार्य करत राहिला, माणुसकीचे दर्शन दिले तर देशाची सुव्यवस्था सुरक्षित राहील. आपणाला संतांनी समता, बंधुता, न्याय आणि शांती यांचे धडे दिले आहेत. त्यांनी आपल्या अभंग कीर्तनातून जन माणसांच्या मनावरील मळभ दूर केले आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्ती महाराज, सोपानदेव, नामदेव, तुकाराम, रामदास, चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार अशा थोर संत विभुतींनी आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवला आहे.
शेवटी काय रिक्त हस्ताने जन्माला आलो आणि शेवटचा मार्ग रिक्त हस्तानेच पार पाडायचा आहे हेच मनुष्याच्या जीवनाचे सत्य आहे. मग पैशाचा, काळ्याबाजाराचा आणि लोभी वृत्तीचा हव्यास कशाला हवा?
शिक्षकांसाठी: या साप्ताहिक अंकात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची वाटा करिअरच्या ही पुस्तिका जोडली आहे. तरी हा अंक आपल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर फॉरवर्ड करावा.
संपूर्ण साप्ताहिक अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
