करिअर मार्गदर्शन: डिप्लोमा इंजिनिअर
स्किल इंडिया, स्टार्टअप
इंडिया, जागतिकीकरण, डिजिटल इंडिया तसेच आर्थिक महासत्तेचे उद्दिष्ट
पूर्ण करण्यासाठी भारताला विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज
भासणार आहे. अभियांत्रिकीच्या माध्यमातून कौशल्याधारित मनुष्यबळाची निर्मिती साध्य
होऊ शकते. सद्या समग्र शिक्षाच्या व्यवसाय शिक्षण योजने अंतर्गत मल्टी स्कील,
ऑटोमोबाईल, ब्युटी आणि वेलनेस आदी दहा प्रकारचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्याने यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण
केल्यानंतर आय. टी. आयमध्ये पंचवीस टक्के आणि तंत्रनिकेतनमध्ये पंधरा टक्के
आरक्षणही ठेवण्यात आले आहे. आयटीआय पूर्ण केल्यानंतर तंत्रनिकेतन (पदविका
अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश
मिळतो.
सद्या पदविका शिक्षणात रोजगाराभिमुख व स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणारे
बनवण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात योग्य ते बदल केले आहेत. आऊटकम बेस शिक्षण हे सुधारित
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे़ या अंतर्गत विद्यार्थ्यांना
रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट, औद्योगिक
प्रशिक्षण, प्रात्यक्षिक संवाद कौशल्य, मुल्यवर्धन
शिक्षण, पर्यावरण आदींवर भर देण्यात आला आहे.
दहावीनंतर तीन वर्षांच्या
तंत्रनिकेतन (पदविका अभियांत्रिकी) अभ्यासक्रम पूर्ण
करून डिप्लोमा इंजिनिअर होता येते.
दहावीला सत्याण्णव
टक्के गुण मिळालेला विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीला प्रवेश घेतो. यामागचे नेमके काय
कारण असेल? बारावी करून चार वर्षांने अभियंता होण्यापेक्षा
दहावीनंतर तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि तीन वर्षांची पदवी करून अभियंता होणे
सोपे जाते. दोन्ही ठिकाणी सहा वर्षे लागत असले तरी दहावीनंतर
पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला हमखास प्रवेश मिळणे
हे आज सहज शक्य आहे. कारण
बारावीला चांगले गुण मिळतील की नाही? या मानसिक गोंधळात राहण्यापेक्षा तीन वर्षांच्या
पदविका अभियांत्रिकीला प्रवेश करून त्यानंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे
विद्यार्थी व पालकांना योग्य वाटते.
दहावीला पंचेचाळीस
टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी डिप्लोमाला पात्र असतात. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर
इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा (सी. ई. टी.) घेतली
जात नाही. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या गुणांनुसार केंद्रीय
प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. इंजिनीअरिंग पदवी प्रथम
वर्षाच्या प्रवेशाच्या दहा टक्के जागा
(साधारणत: पंधरा
हजार जागा) इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी डिप्लोमाच्या
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात.
या जागांमध्येच पहिल्या वर्षी रिकाम्या राहिलेल्या
जागांची भर पडते. दरवर्षी या सर्व जागा मिळून जवळपास पन्नास हजारापेक्षा
जास्त जागा पदवी इंजिनीअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी उपलब्ध होतात.
महाराष्ट्रात एकूण
पाचशे पेक्षा जास्त पॉलिटेक्निक असून त्यांची प्रथम वर्ष प्रवेश क्षमता सुमारे दोन
लाख आहे.
तंत्रशिक्षण संचालनालय
अंतर्गत असणाऱ्या सर्व पॉलिटेक्निक संस्थांची माहिती तसंच संस्थेमध्ये असणारे अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता, फोन
नंबर्स, वेबसाइट्स इ. सर्व बाबींची माहिती www.dte.org.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची
वेबसाइट www.msbte.com यावर अभ्यासक्रम आणि संबंधित माहिती मिळू शकेल.
अभियांत्रिकी शिक्षणाबाबत
विशेषत: ग्रामीण भागात पुरेशी जागरुकता आजही आढळत
नाही. अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय खर्चिकही नाही. शासनस्तरावर अनेक शिष्यवृत्ती, फी
माफी व अनुषंगिक सवलती सर्व समाजघटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत हा समज पूर्णपणे
खरा नाही. आजमितीला भारतात व जागतिकस्तरावर उपलब्ध असणारे जास्तीत जास्त रोजगार हे
अभियांत्रिकी क्षेत्रातीलच असल्याचे आढळून येते. तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठीची
क्षमता अभियांत्रिकीतून विकसित होते असे निदर्शनास आले आहे.
रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी, कमी खर्चात पूर्ण होणारे शिक्षण, उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेपासून सुटका इत्यादि जमेच्या बाजू पाहता दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका हा एक उत्तम पर्याय ठरतो. पदविका शिक्षणामुळे पाया अधिक भक्कम बनतो. दहावीनंतर तीन वर्षात रोजगार देणारा हा अभ्यासक्रम निश्चितच उपयुक्त आहे. भविष्यात आपआपल्या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे यात शंकाच नाही.
मधुकर घायदार, नाशिक ९६२३२३७१३५

Comments
Post a Comment