करिअर मार्गदर्शन: इंजिनिअर
विज्ञान,
तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर
करणे, हेच इंजिनिअर - अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये
अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे, त्यामुळेच रोजगाराच्या
असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड मागणी असणार आहे.
सध्या अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा
व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे अभियंता बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने
अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घ्यावा.
अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग
शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी
अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. पण अशा वेळी स्वाभाविकच मनात प्रश्न
उभे राहतात, की खरंच इतक्या अभियंत्यांची आवश्यकता आहे का?
इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश
विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा
निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून
घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड
करावी. अधिक क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य
ठरतं. (उदा. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल) स्पेशलाइज्ड
शाखांची निवड पदवीच्या वेळेस केल्यास आपल्या रोजगाराच्या संधी त्या शाखेपुरत्याच
मर्यादित राहतात. उदा. ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग शाखेची निवड केल्यास केवळ वाहन
उद्योगापुरतच्या नोकरीच्या संधी मर्यादित राहतात. त्याऐवजी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची
निवड केल्यास पुढे एरोस्पेस, मरिन, ऑटोमोबाइल, रेफ्रिजरेशन, प्रॉडक्शन, ऑटोमेशन
यांसारख्या अनेक इंजिनीअरिंग क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
फ्लिपकार्ड, स्नॅपडील यांसारखी ऑनलाइन
बाजारपेठही अभियंत्यांनीच बनवली आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकास अंतर्गत ‘इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी-२०१९’ तयार केली असून यामध्ये
हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून अभियंत्यांसाठी एक कोटी रोजगाराच्या
संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे. नॅनो टेक्नॉलॉजी, आयटी, एरोनॉटिक्स अशा नव्या
अभियांत्रिकी शाखा सुरू झाल्या असून, त्यांचेही क्षेत्र विस्तारत आहे. आजही अभियंत्यांना
नोकरीच्या कोट्यवधी संधी उपलब्ध आहेत. पण त्याने त्या त्या क्षेत्रातील कौशल्ये
आत्मसात करायला हवीत. आजही अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी
मिळते. त्यांतील चाळीस टक्के विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याबरोबरच कॅंपस
इंटरव्ह्यूमधून निवडले जातात. यूपीएसी, एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या
विद्यार्थ्यांमध्ये अभियंत्यांचे प्रमाण अधिक आहे. बॅंकिंग क्षेत्रातही
व्यवस्थापन, वित्त नियोजन आणि तांत्रिक विभागात अभियंते मोठ्या पगारावर काम करतात.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर व्यवस्थापकीय शिक्षण घेतले, तर
रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध आहेत.
राज्यात पदवी अभ्यासक्रमाचे ३७६ महाविद्यालय असून पदविका अभ्यासक्रमाचे ४९३ तंत्रनिकेतन आहेत त्यांची अनुक्रमे प्रथम वर्ष प्रवेश क्षमता १,५९,०३७ आणि १,८१,९३७ आहे. अभियंता बनायची इच्छा असेल तर कोणतीही भीती न बाळगता या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा पण त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची तयारी हवी.
मधुकर घायदार, नाशिक ९६२३२३७१३५
%20(15).jpeg)