छोट्या
भक्तांनो.....
मी
तुमचा गणपती बाप्पा। माझ्या स्वागताची तयारी जोरात चालली असेल, हो ना?
इकडे उंदीर मामा सुद्धा घाई करीत आहेत, "चला
बाप्पा, आपले लाडके भक्त आपल्याला बोलावीत आहेत" असं तो
म्हणतोय. कारण त्यालाही गोडधोड खायला मिळते ना म्हणून.... तो घाई करतोय.
पण
मुलांनो मी पृथ्वीतलावर आल्यावर दहा दिवस तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा
तुमचे मागणे ऐकत असतो,
त्याआधी
माझ्या मनातील माझे गार्हाणे या पत्राद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऐकाल ना
तुम्ही? वाचाल ना माझे पत्र? माझी कित्येक नावे रूपे
वेगवेगळी असली तरी मी एकच आहे, एकसमान आहे. अष्टविनायकाचे
रूप असो किंवा लालबागचा राजा असो माझा हा गणेशोत्सव तुम्ही गाजावाजा न करता,
श्रद्धा भक्तीने, गर्दी न करता शांततेत साजरा
करावा असे मला वाटते.जबरदस्तीने वर्गणी गोळा करून तुम्ही नैवेद्याला गोड-धोड करत
अवास्तव पैसा खर्च करण्यापेक्षा ती रक्कम सत्कारणी लावा. नैवेद्याचे म्हणाल तर
घरच्या घरी केलेल्या मोदकांवर साजूक तूप नसेल तरीही खरोखरच माझे पोट समाधानाने
भरते रे!
कर्णकर्कश्
गाणी लावून माझे कान अजून मोठे करण्यापेक्षा तुमच्या कंठामधून गायलेली सुमधुर
भक्तीगीते मला ऐकायला आवडतील, त्यामुळे तुमचे पाठांतर वाढेल. तुमचे वाचनही
वाढेल. कोरोना काळात तुमचं वाचन, लेखन पाठांतर फार कमी झालंय.
अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही आळशी झालात. अभ्यास वाढवा, विद्येची
पूजा म्हणजेच माझी पूजा. माझ्या
छोट्याशा डोळ्यांमधून मला न पाहणारी ही नाच-गाणी आता तुम्हीच थांबवली पाहिजेत. मी
तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तर आहेच पण तुमच्या
जोपासलेल्या कला, त्याचे सुंदर दर्शन या दहा दिवसात माझ्या
कृष्णपिंगाक्ष डोळ्यांना झाल्यास मी तर धन्य होईल रे, बाळांनो!
मुलांनो,
या दहा दिवसात तुम्ही मनोभावे माझी केलेली पूजा, आरती, समाजोपयोगी
कार्य त्यातूनच मला प्रेमाने ओथंबलेला नमस्कार मिळतो. सण-उत्सवाच्या नावाखाली
पैशांची उधळपट्टी, सोन्याचांदीचे दागिने प्रदर्शन, नाचगाणे करून सर्व वातावरण प्रदूषित करण्यापेक्षा पर्यावरण संवर्धन करा.
प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेला ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण
थांबवा. तुम्ही माझी मनोभावे प्रार्थना करत आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे नियम
पाळून करत राहा, गरजू लोकांच्या उपयोगी पडा, माझ्यासारखे तुम्हीही आई-बाबांचे थोरामोठ्यांचे ऐका, फक्त दहा दिवसच नाही तर आयुष्यभर मी तुमच्यासोबत आहे.
चला
आता येऊ का? माझी आई बोलावित आहे मला.... मी आता दहा दिवस तुमच्या सोबत राहणार म्हणून
तिलाही माझी काळजी वाटते रे! पण तुम्ही, मी
सांगितल्याप्रमाणे छान तयारी करा हं!
येतोय
मी!
गणपती
बाप्पा.....
तुमचाच
बाप्पा
लेखन: सौ.
नर्मदा नरेश कनकी,
सोलापूर.
खालील लिंकवर अंक उपलब्ध आहे
अंक वाचण्यासाठी..