राज्यातील आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश
एक लाख ४९ हजार २६८ जागांसाठी प्रक्रिया सुरु
मधुकर घायदार : सकाळ वृत्तसेवा
कनाशी, ता. १७ : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील ४१९ शासकीय व ५५३ खासगी आय टी आय मध्ये एकुण १ लाख ४९ हजार २६८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापुर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे.
नाशिक मधील सातपुर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या २२०० जागांसाठी तर त्र्यंबकनाका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे ११ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या ४३० जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहे.
एकुण चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
सर्व आयटीआय मध्ये अर्ज स्वीकृति केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृति व निश्चिती करू शकतील. प्रवेशाचा सर्व तपशील माहितीपुस्तिका संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शन मध्ये आहे. प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा.
आयटीआय प्रवेश वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे : प्रारंभ १७ जून
प्रवेशअर्जांची निश्चिती करणे : प्रारंभ २२ जून
इयत्ता दहावीची गुणपत्रिका वितरित करण्यात आल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल.
प्रवेश अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: १५० रुपये
राखीव प्रवर्गातील विद्यार्थी: १०० रुपये
राज्याबाहेरील विद्यार्थी: ३०० रुपये
अनिवासी भारतीय विद्यार्थी: ५०० रुपये
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरुन त्याची प्रत घ्यावी. सर्व आवश्यक मुळ कागदपत्रासह जवळच्या आयटीआय मध्ये जावून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची पावती दिली जाईल. अर्ज स्वीकृति केंद्रावर निश्चित केलेल्या अर्जाचाच सर्व प्रवेश फेरीसाठी विचार करण्यात येइल, असे कळविण्यात आले आहे.