मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम
लेखक श्री. सी. एच. बिसेन सर, गोंदिया, 8390678303
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्"
अर्थात "जेव्हा जेव्हा धर्म कमी होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो".
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे" या संस्कृत श्लोकाचा मराठीतील अर्थ आहे: "साधुजनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टजनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगी अवतरित होतो," असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार, त्रेतायुगामध्ये रावणाची अत्याचार वृत्ती शिंगेला पोहचली होती. या अत्याचार वृत्तीला संपविण्यासाठी व धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू मृत्युरुपी जगात श्रीराम म्हणून अवतरित झाले.
भगवान श्रीराम हे हिंदू धर्मातील दैवत व भगवान विष्णूचे सातवा अवतार होते. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते.
श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला. महर्षि वाल्मिकींच्या रामायणानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क राशीत श्रीरामाचा जन्म झाला. भगवान राम यांचा जन्म 22 फेब्रुवारी 7119 ईसापूर्व झाल्याचे समजले जाते. जन्माच्या संबंधाने एकवाक्यता नाही. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नववा दिवस असल्यामुळे हा दिवस श्रीरामाचा जन्मदिवस, रामनवमी म्हणून साजरा करतात.
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रत व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता.
प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्याला भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटले जाते.
