Skip to main content

विठू लेकूरवाळा

 



विठू लेकूरवाळा

 

          विठू आहे लेकूरवाळा

          संगे भक्तांचा गोतावळा

             किती छान वाटतंय ! माझे वारकरी भक्त माझ्या भेटीसाठी गावागावांतून पंढरीत या चंद्रभागेच्या तीरावर तंबू ठोकून राहणार आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून अनवाणी पायाने पुरुषभक्त भगव्या पताका, झेंडे खांद्यावर सावरत आणि भक्तस्त्रियां तुळशीचे वृंदावन डोईवर घेऊन चालत येत आहेत. येताना माझ्या संतभक्त ज्ञानोबा, तुकोबांनाही भेटून आले आहेत. पांढरा सदरा, पायजमा किंवा धोतर आणि डोईवर पांढरी गांधी टोपी किंवा पागोटे घालून टाळ चिपळ्यांच्या निनादात ते मार्ग आक्रमित आहेत. माझ्या भेटीची ओढ अनावर होवून माझ्या पायांवर दंडवत घालणार आहेत. मी त्यांचा सावळा विठू भक्तीचा भोळा आहे. त्यांची निरिच्छ, निरागस भक्ती मला खूप भावते म्हणून मी त्यांना दर्शन देण्यासाठी अठ्ठावीस युगांपासून रुक्मिणीसंगे विटेवर करकटीवर ठेवून उभा आहे. माझे भक्त आनंदाने आपल्या अश्रूचे सिंचन माझ्या पायी करतात.

                     दूरदूरच्या गावाहून मजल दरमजल करत हे वारकरी भक्त माझे नाम मुखात घेवून नाम्या, तुक्या, नामा एकाने लिहिलेले अभंग, कीर्तन, गवळणी गुणगुणत येत आहेत. आमचे अश्वही त्यांच्या साथीला आहेत. पायी चालून त्यांचे पाय दुखू लागतात. मग मी रात्री ते झोपल्यावर त्यांच्या पायावर प्रेमाने हळुवार फुंकर घालतो आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या जोमाने, ऊर्जेने पुन्हा पंढरीची वाट चालू लागतात. ढोल, ताशे, लेझीम, हलगी वाजवत ते सर्वांचे मनोरंजन करत असतात. हातातील टाळ चिपळ्यांसंगे त्यांची पावले भरभर पडत आहेत. त्यांना एकादशीच्या आधीच पंढरी गाठायची आहे. त्यांचा हा सावळा विठू त्यांच्या प्रतिक्षेत आहे. गळ्यात तुळशी माळा अन मधुर असा गळा, गाती अभंग मुखाने जगती जीवन सुखाने असे माझे हे वारकरीभक्त शेतकरी, कामकरी आणि साधेभोळे आहेत.

        नको त्यांना पैसा अडका,

        नकोय बंगला गाडी

        प्रिय त्यांना चंद्रमौळी झोपडी

        हवी कशाला माडीवर माडी

           अशां शब्दांत ते विठूची गुज करत असतात. त्यांना माझ्या भक्तीची ओढ आहे. माझ्या दर्शनाने त्यांचे डोळे निवून तृप्त होतात. सर्वजण आपला संसार, परिवार सोडून मज भेटीसाठी पंढरीला येऊ लागले आहेत.

   "बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल ,जीवभाव" अशी त्यांची स्थिती आहे.

       वाटेवरच्या मुक्कामावर दानशूर भक्त त्यांना भोजन, पाणी आणि राहण्याची व्यवस्था पुरवत असतात. त्या बदल्यात हे वारकरी गोड गळ्याने अभंगगान करून माझ्या नावाचा जयघोष करतात. "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" हा नादघोष सतत त्यांच्या मुखात घोळत असतो. कपाळावर काळा बुक्का आणि अष्टगंध लावून मोठ्या आनंदाने मिळूनी सारे पंढरीसी येऊ लागले आहेत. वाटेत कितीतरी भक्त त्यांना येऊन मिळतात. सर्वांच्या मुखात एकच जयघोष असतो, "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ".त्यांचा विठू डोळ्यांची तोरणे करून त्यांची वाट पाहत आहे. आपल्या भक्ताच्या डोई वरदहस्त ठेवण्यासाठी आतुरला आहे.

        नको भक्ताला गाडीघोडा 

        नको त्याला पुरणपोळी

        भक्ताला पहायची आहे

        विठूची मूर्ती भोळी

            विठू आपले दैवत आहे. त्याच्या अंगी माऊलीचे सर्व गुण आहेत. हे भक्त वारकऱ्याला माहित आहे. म्हणून त्या भोळ्या लाडक्या दैवताला डोळे भरून पहावे, त्याचे नाव सदामुखी राहावे म्हणून भक्त चंद्रभागेच्या वाळवंटात आपले बस्तान बसवणार आहे. एकादशीचा उपास करणार आहे. एकदा का विठूचे म्हणजे माझे दर्शन झाले की त्याच्या डोळ्याचे पारणे फिटणार, त्याचा उपास सुटणार आणि माझा भक्त अन्नाचा घास तोंडात घेणार! त्याला माझ्या नामाशिवाय काहीच सुचत नाही. इतका तो माझ्या भक्तीत रममाण, तल्लीन झाला आहे.


  

         अभंग आळवताना भक्त म्हणतात,      

   रुक्मिणी विठ्ठल | माझीच माऊली| सुखाची सावली| हरिनामे || आज संत महंतींनी कितीतरी अभंग, ओव्या, गवळणी लिहून ठेवल्या आहेत. हरिनामाचे अभंग वारकऱ्यांना मुखद्गत आहेत. रोज मंदिरात सायंकाळी माझ्या अभंगाचे पारायण करत आपली कामे करत दिवस काढणारा हा भक्त आता मात्र विठूच्या दर्शनासाठी पंढरीची वाट तुडवत आहे. त्याला विठूच्या पायावर आपले मस्तक टेकवायचे आहे. आपले गाऱ्हाणे ऐकवायचे आहे. कीर्तनात नाचून त्याला विठूच्या मूर्तीला भजायचे आहे कारण तो सच्चा भक्त आहे. वारकरी आहे.

          दरवर्षी आषाढी, कार्तिकी वारीला तो पंढरीत येत असतो. कीर्तनात गुणगान गात नाचत असतो. हरिनामाचा झेंडा फडकवतो. जयघोष करत असतो. तो थकत नाही, रुसत नाही तर आपल्या लाडक्या दैवताला कधी भेटेल अशी आस घेऊन येत असतो. काही काळापुरता

त्याला घराचा, परिवाराचाही विसर पडतो . आपला देवाधिदेव असणाऱ्या विठूचरणी लीन होताना त्याला दिसत असतात फक्त विठूची पावले आणि तो त्याच नादात इथे "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" चा नादघोष करतो.

तो विठूपुढे, माझ्यापुढे नतमस्तक होतो. माझ्या पावलांना आपल्या अश्रू सिंचनाने भिजवून टाकतो

 विठूपुढे तो कोणीच नसतो. नसतो साहेब, नसतो रईस, नसतो साक्षर, नसतो उच्चवर्णीय! तर तो असतो फक्त वारकरी! विठ्ठलाच्या नावाची काठी नाचवणारा एक सामान्य वारकरी! ज्याला निरपेक्षपणे विठूला न्याहाळायचे आहे, भजायचे आहे, पुजायचे आहे. त्याच्याजवळ हरिनामाचे एकच हुकमी साधन आहे. त्याने तो आपल्या दैवताला आळविणार आहे .तुळशीमाळा गळा चढवून तो विठूला पुजणार आहे. मग विठूने  त्या बदल्यात त्याला काही नाही दिले तरी चालेल, पण दर्शनाची ओढ घेऊन तो वारी करत पंढरीला येतो आहे. रिंगणात फुगडी घालत आहे. चालून चालून थकलेल्या पायांनी तो रिंगणात सुंदररित्या नाचत आहे. पुढे विठूचे अश्व आणि मागे टाळकरी, वारकरी, हलगीवाले, वीणावाले, तुळशी वृंदावन डोईवर घेऊन बाया पळत असतात आणि रिंगण घालत असतात. फुगडी घालत असतात आणि सर्वांचे मनोरंजन करत असतात. मनाला थोडा विरंगुळा घेत असतात.

 


लेखिका सौ. भारती सावंत, खारघर, नवी मुंबई

9653445835


Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...