देवशयनी एकादशी म्हणजे काय?
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
एकादशी व्रताला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे . दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकारमास किंवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात . काही ठिकाणी या तिथीला ' पद्मनाभ ' असेही म्हणतात. सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते. या दिवसापासून चातुर्मास सुरू झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात झोपतात आणि त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी जेव्हा सूर्य तूळ राशीत जातो तेव्हा ते उठतात. त्या दिवसाला देवोत्थानी एकादशी म्हणतात . मधल्या अंतराला चातुर्मास म्हणतात.
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा...
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा...
पुरातन काळापासून आषाढी एकादशीची ही कथा सांगण्यात येते. त्यात म्हटलं आहे की, सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट होता. त्याचा राज्यात प्रजा आनंदी राहायची. पण त्या राज्यात एक वेळ अशी आली की, सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. प्रजेवर संकट कोसळलं, राजाही अस्वस्थ झाला. एके दिवशी यावर उपाय शोधण्यासाठी राजा जंगलात निघून गेला. जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं.
राजाने ऋषीकडे व्यथा मांडली. त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला. ते म्हणाले की, राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचं व्रत खऱ्या मनाने आणि विधिपूर्वक करा. त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल. राजा राज्यात परतला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं. त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून वरुणराजाला खूष करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं आहे.