कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील संधी
पूर्वीच्या काळात डॉक्टर, अभियंता, वकील या मोजक्या काही क्षेत्रात करिअर केले की समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असे. उच्च शिक्षण घेणारे फार तुरळक युवक असत. आता मात्र बदलती जीवनशैली, जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण तंत्रज्ञानामुळे आज विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे.
आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक युवकाला चांगले करिअर करण्याची इच्छा असते. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. अभियांत्रिकीच्या जवळजवळ प्रत्येक शाखेची नाळ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग - संगणक अभियांत्रिकीशी जुळली आहे. यात मेमरी सिस्टीम, सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट व संगणकाला जोडण्यात येणाऱ्या उपकरणांची रचना व उत्पादन, हार्डवेअर इंजिनिअरींग, सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी, मोबाईल टेक्नोलॉजी, प्रोग्रामिंग लॅग्वेजेस, कॉम्प्युटर असेंब्ली, ट्रबलशुटींग, इंटरनेट टेक्नोलॉजी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, डिझाईन, मायक्रोचीप टेक्नोलॉजी, अॅनिमेशन इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव असतो.
सद्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर सुरु झाला आहे. आज देशातील आयटी क्षेत्रातील उलाढाल सुमारे 180 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे काळाबरोबर युवकांनी स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे. नवीन रोजगारासाठी आवश्यक असणारे कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.
पूर्वी कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी बरेच महिने, वर्षे लागत असे. हजारो धूळ खात पडलेल्या फाईल्स, त्या शोधणारे कर्मचारी व काम न झाल्यामुळे त्रासलेले नागरिक असे चित्र सर्व ठिकाणी होते. पण पंचवीस वर्षापूर्वी भारतात संगणक युग अवतरले. संगणकाच्या प्रसारामुळे माहितीची देवाणघेवाण वेगवान झाली अन व्यवहार सोपे झाले. रेल्वे रिझर्वेशनपासून ते विमानसेवेपर्यंत आणि अंतराळक्षेत्रापासून ते शेतीक्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात वेळेची बचत तर झालीच पण त्याचबरोबर जग छोटे झाले. भारतातून विदेशात पाठविलेले पत्र पोहचायला पूर्वी दोन महिने लागत होते ते आता ईमेलने एका सेकंदात जाऊ शकते इतकी अविश्वासनीय क्रांती आज झालेली आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकांचा उपयोग केला जातो. यात माहिती संग्रहित करणे, गणिती सूत्र, आलेख, आकृत्या, रंगीत चित्रे, उद्योगधंदे, व्यापार, बँका, कॉल सेंटर, शेअर मार्केट, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, सैन्य दल, शस्त्रक्रियेत, घराचे डिझाईन, जन्मकुंडली, कार्यालयीन कामे, वैद्यकीय निदान, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, अंतराळ विज्ञान इत्यादी अनेक कामात संगणकाचा उपयोग केला जातो.
विद्यार्थ्याने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचे ज्ञान घेतल्यास तो स्वतःचा व्यवसाय तसेच नोकरीही करू शकतो. त्यात प्रामुख्याने एमआयडीसी मधील विविध कंपन्या, एचसीएल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, सन मायक्रोसिस्टम, टीसीएस, एडोब, एक्चेजर, आईबीएम, सिस्को, याहू, इन्फोसिस, ओरेकल, टेक महिंद्रा, केंद्रीय रेल्वे सेवा, केंद्रीय संरक्षण विभाग, जलसंपदा व पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा निर्मिती केंद्रे, केंद्रीय संशोधन संस्था उदाहरणार्थ इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) बी.आर.सी. (भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर), केंद्रीय खाणकाम विभाग, बदलत्या काळानुसार संगणक अभियंते, बँकिंग क्षेत्रे, नेटवर्क आणि संप्रेषण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी विविध उपकरणे व यंत्रांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामात देखील कॉम्प्युटर इंजिनीअर आपले करिअर करू शकतात. मुख्य म्हणजे कॉम्प्युटर इंजिनीअर केंद्रीय लोकसेवा आयोग व विविध राज्यांचे लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या माध्यमांतून भारत सरकार व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत अधिकारी पदांवर देखील कार्य करू शकतात. सॉफ्टवेअरमधील ज्ञान घेतलेला युवक ऑनलाईन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणतेही प्रोजेक्ट किंवा ऑनलाईन काम घरी बसून करू शकतो. हार्डवेअर क्षेत्रातील युवक स्वतःचा व्यवसाय करू शकतो व त्यात तीस ते साठ हजार रुपये कमवू शकतो. जिथे जिथे संगणक आहे तिथे नोकरी उपलब्ध आहेतच. यात दीड लाख ते सहा लाख रुपये वार्षिक वेतन मिळू शकते. आज खासगी कंपन्यांपासून ते सरकारी कार्यालयापर्यंत पेपरलेस काम करण्याचा प्रयत्न सुरु असून संगणकाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
मधुकर घायदार
9623237135
https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz