संपादकीय...
ज्या क्षेत्रात बुद्धी चालते त्या क्षेत्रातच करिअर
करा
“भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे कोणत्याही
प्रकारच्या नोकरीसाठी नेमण्यास उपयुक्त नाही.” असे खळबळजनक पण धक्कादायक वाटणारे
विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी केले. आसपास थोडीशी
डोळसपणे नजर फिरविली तरी मूर्तींच्या म्हणण्यातील उव्दिग्नता आपल्या लक्षात येईल.
आज देशातील ५० हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या आवश्यक कुशल मनुष्यबळाअभावी पडून
असल्याचा अहवाल एका अर्थविषयक मासिकाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य पाया समजला जातो. आयुष्याचे जवळपास
२० टक्के दिवस आपण शिक्षण घेण्यामध्ये घालवतो, त्यानुसार नोकरी मिळते. ब्रिटीश
शिक्षण पद्धतीमध्ये फक्त भाषा (इंग्रजी) आणि शास्त्र याविषयांवर भर होता. हळूहळू
कौशल्य विकास शिक्षणातून लुप्त होत गेला. गेल्या पन्नास वर्षात शिक्षण
क्षेत्रामध्ये ज्ञानही वरवर दिले जाते. पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही सखोल नसते आणि
काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. कमालीच्या पुस्तकी, साचेबंद, बदललेल्या मार्केट
किंवा परिस्थितीच्या गरजांपासून आणि तरीही दिवसेंदिवस खर्चिक बनत चाललेल्या भारतीय
शिक्षण व्यवस्थेकडे पुस्तकी आणि ‘घोकलेल्या’ माहितीपलीकडे न जाऊ शकणारे आणि मुलभूत
कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ आपली शिक्षणव्यवस्था ‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे.
बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये ज्यांचा उपयोग काडीमात्र
नाही. त्यामुळे फक्त १५ ते २० टक्के पदवीधर नोकरीयोग्य आहेत, असे अभिप्राय बऱ्याच
कंपन्यांकडून मिळतात.
देशात दहावी पासूनच करिअरचा विचार
करणारे २३ टक्के, बारावीपासून ३८ टक्के आणि पदवीनंतर याबाबतचा विचार सुरु करणारे
४७ टक्के विद्यार्थी आहेत. फक्त १८ टक्के विद्यार्थीच करिअर विषयक समुपदेशन
सुविधेचा लाभ घेतात. आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच असून
चीनमध्ये ४५ टक्के, अमेरिकेत ५६ टक्के, जर्मनीत ७४ टक्के, जपानमध्ये ८० टक्के आणि दक्षिण कोरियात ९६ टक्के कुशल
मनुष्यबळ असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्य शिक्षणाचे चीनमध्ये १००
तर जर्मनीमध्ये १६० विद्यापीठे आज अस्तित्वात आहेत.
भारतात आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. १६
टक्के युवकांना व्यवसाय करावा असे वाटते तर खाजगी क्षेत्राकडे वळणाऱ्यांचे प्रमाण
फक्त ६ टक्केच आहे. राज्याच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणांवर ७४ टक्के
विद्यार्थ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.
शाळा महाविद्यालयामध्ये मोठे होतांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवितो. कश्यामध्ये जीव रमतो, काय सहजपणाने समजते तेच क्षेत्र विद्यार्थ्याने निवडावे. ज्या क्षेत्रात बुद्धी चालते त्या क्षेत्रातच करिअर करायला हवे.
*आजचा संपूर्ण अंक Shikshak Dhyey India App वर उपलब्ध.....
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz