राज्यस्तरीय
उपक्रम अहवाल कसा लिहावा?
–
डॉ. गीतांजली बोरुडे
(वरिष्ठ अधिव्याख्याता, रा. शै. सं. व प्र. प. पुणे)
मुलाखतकार – श्री.
अजय काळे ९९२१६८९४६८
(शिक्षक ध्येय,
जिल्हा प्रतिनिधी सांगली)
नमस्कार शिक्षक बंधू
भगिनीनो,
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि त्यांच्या ऊज्ज्वल भवितव्यासाठी जर आपण नवनवीन उपक्रम राबवीत असाल तर तुम्हाला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची एक चांगली संधी आहे.
SCERT पुणे व NCERT नवी दिल्ली द्वारा घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धा किंवा ‘शिक्षक ध्येय’
सारख्या अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था मार्फत घेण्यात
येणाऱ्या विविध स्पर्धा असोत त्यात सहभागी होणेसाठी आपणास विहित नमुन्यात अहवाल सादर
करावा लागतो. बऱ्याचदा आपणास सहभागाची तीव्र इच्छा असते पण अहवाल कसा लिहावा? ही
मुख्य समस्या असते. याबाबत आपण माहिती घेण्यास नक्कीच उत्सुक असाल ही
आपली गरज ओळखून आपल्याशी या प्रकट मुलाखती द्वारे चर्चा करण्यासाठी राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे च्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गीतांजली बोरुडे या
उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण उपक्रमाबाबत चर्चा करूयात.
मी – नमस्कार मॅडम,
आज आपण आमच्याशी ‘राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा’ ची माहिती देण्यासाठी उपस्थित
राहिलात त्या बद्दल आपले मन:पूर्वक स्वागत.
डॉ. बोरुडे – सर्वाना
नमस्कार, यानिमित्ताने मला सुध्दा शिक्षकांशी बोलायला मिळाले.
प्रश्न
–बऱ्याचदा असे दिसून येते की नवोपक्रम म्हणून कृतिसंशोधन सादर केले जाते. माझा
प्रश्न असा आहे की, नवोपक्रम व कृतिसंशोधन यात नेमका काय फरक आहे ?
डॉ. बोरुडे – चांगला प्रश्न आहे. राज्यस्तरावर सुध्दा अनेकदा नवोपक्रम म्हणून कृतिसंशोधन पाठवले जातात. मला वाटते याबात आपण खालील तक्ता अभ्यासला तर आपणास कृतिसंशोधन व नवोपक्रम यातील फरक समजून येईल. तक्ता उद्याच्या शिक्षक ध्येय अंका मध्ये नक्की बघा.
प्रश्न – नवोपक्रम म्हणजे काय ?
डॉ. बोरुडे – नवोपक्रम या नावातच
त्याची व्याख्या दडली आहे. नवा असा उपक्रम म्हणजे नवोपक्रम. म्हणजे थोडक्यात असे
सांगता येईल की, व्यक्तीला
प्रतीत होणारी नवीन कल्पना म्हणजे नवोपक्रम होय. कोणतेही
कार्य करताना तेच कार्य नेहमीपेक्षा जर नवीन पद्धतीने केले तर त्या कार्यापासून
मिळणारा आनंद मोठा असतो. ही बाब शिक्षण प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीने पारंपरिक अथवा प्रस्थापित पद्धतीपेक्षा
वेगळा मार्ग अनुसरून राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय. यावरुन आपणास नवोपक्रम ही संकल्पना समजण्यास मदत
होईल.
प्रश्न –
सर्जनशील विचार मांडणाऱ्या व्यक्तीकडे कोणती गुण वैशिष्टये असावीत ?
डॉ. बोरुडे –
नवोपक्रमाचे अहवाल लेखन हा महत्वाचा दस्तावेज असतो. कारण आपण जी नव कल्पना मांडणार
आहोत त्यामध्ये स्थलसापेक्ष, कालसापेक्ष व व्यक्तीसापेक्ष यापैकी किमान एक
नाविन्यता असावी. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्जनशील विचार मांडणाऱ्या व्यक्तीकडे
प्रबळ अशी इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, धैर्य, चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असली
पाहिजे.
प्रश्न
–नवोपक्रम – शीर्षक, गरज व महत्व हे मुद्दे कसे विचारात घ्यावेत ?
डॉ. बोरुडे – अहवाल लेखन करताना नवोपक्रमाचे शीर्षक
खूप मोठे असू नये, तर ते आटोपशीर असावे. उपक्रमाचे नेमके नाव लिहावे. नाव
लिहिताना आपला उपक्रम व शीर्षक हे समर्पक असे असावे.
नवोपक्रमाची गरज व महत्त्वलिहिताना नवोपक्रम
निवडण्याचे कारण काय ? याबद्दल माहिती द्यावी. त्याचबरोबर हा
उपक्रम का राबविला, याचे वेगळेपण व उपयुक्तता याचे लेखन असावे. इथे मुद्द्याचे सबटायटल न देता वर्णन स्वरूपात अथवा परिच्छेद
स्वरुपात विवेचन थोडक्यात असावे.जेणेकरून हा अहवाल वाचणाऱ्याला नवोपक्रम नेमका कोणत्या
गरजेपोटी निर्माण झाला व हा कसा महत्वाचा उपक्रम आहे हे समजण्यास मदत होईल.
प्रश्न – नवोपक्रमाची
उद्दिष्टे मांडताना काय दक्षता घ्यावी ?
डॉ. बोरुडे –या उपक्रमामुळे काय
साध्य होणार आहे व यामुळे कोणामध्ये बदल होणार आहे हे सुस्पष्ट शब्दात मांडणारी ३
ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत. ती मांडताना पाल्हाळ लावू नये.
उद्दिष्टे ही कमीत व नेमक्या शब्दात
मांडावीत.
प्रश्न –
नवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही अहवाल लिहिताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत ?
डॉ. बोरुडे –नवोपक्रम अहवाल
लेखनातील हा महत्वाचा भाग असून विस्तारीत स्वरूपात याचे लेखन करावे लागते. मागील
प्रश्नात उपक्रमाचे शीर्षक, गरज व महत्व याची चर्चा केली आहे. या ठिकाणी
आपणनवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही या दोन्ही बाबींचा एकत्रित विचारकरणार आहोत.
जसे की नवोपक्रमाची
अंमलबजावणी कशी केली.हा
उपक्रम राबवत असताना संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी अगर सहकारी शिक्षक यांच्याशी केलेली चर्चा इथे मांडता येईल. त्यासाठी नियोजन कसे केले?, उपक्रमासाठी इतरांची घेतलेली मदत याचा
समावेश करावा. हा उपक्रम राबवत असताना कोणत्या योजना राबविल्या, त्यासाठी घेतलेला विद्यार्थी सहभाग,आवश्यक
साधनांची निर्मिती करून त्याचा वापर कसा केला याचे वर्णन करावे. इथे काही साधने ही
उपक्रमाशी निगडीत तर काही साधने ही मूल्यमापनाशी संबधित असू शकतील याचे विवेचन
आपल्या अहवालात असावे. याचे लेखनसविस्तर व मुद्देसूद असावे.
नवोक्रमाच्या कार्यवाहीचे वर्णन करत असताना उपक्रम पूर्वस्थितीची निरीक्षणे
व त्यांच्या नोंदी घ्याव्यात. महत्वाचे म्हणजे आपण आपला नवोपक्रम राबवत असताना तो
कोणत्या कालावधीत राबवला याचा उल्लेख करताना तो वेळापत्रक स्वरुपात मांडता येईल.
अगदी उपक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतच्या कालावधीचा समावेश करता येईल.
आपल्या नवोपक्रमामध्ये एकच
नाहीतर अनेक उपक्रमांचा किंवा काही कृतींचा समावेश असतो त्याची यादी देणे अपेक्षीत
असते. यामुळे वाचकाला आपल्या नवोपक्रमामध्ये कोणकोणते उपक्रम व कृतींचा समावेश आहे
हे समजते. याबरोबरच उपक्रमाच्या कार्यवाही दरम्यानची निरीक्षणे व माहितीचे केलेले
संकलन याची नोंद आपल्या अहवालात असावी. यामुळे आपल्या अहवालातून उपक्रम
पूर्वस्थिती व प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर दिसून आलेला बदल ठळकपणे लक्षात आणून सहज
साध्य होते.
प्रश्न – नवोपक्रमाचे यशस्विता मांडताना कोणत्या बाबीवर भर द्यावा असे वाटते ?
डॉ. बोरुडे
–नवोपक्रमाची यशस्विता लिहिताना ती उद्दिष्टानुसार लिहावी. हे मांडत असताना आपण जर
काही आलेख, तक्ते वापरले असतील तर त्याचा समावेश करू शकता. या नवोपक्रमामुळे
कोणाकोणात बदल झाले व काय बदल झाले हे मांडावे. यामुळे आपला नवोपक्रम किती यशस्वी
झाला हे समजण्यास मदत होते. यासाठी उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. उपक्रमाची
फलश्रुती मांडत असताना आवश्यक असल्यास शेकडेवारी, आलेख वापर याची नोंद अहवालात
घ्यावी. अथवा वर्णनात्मक विधानाच्या स्वरूपात नोंदवावी.
प्रश्न –
नवोपक्रमाचा समारोप लिहिताना कोणते मुद्दे लिहावेत ?
डॉ. बोरुडे –प्रस्तुत नवोपक्रम हा भविष्याचा वेध
घेणारा विद्यार्थी, शिक्षण संस्था यांची प्रगती साधणारा कसा
आहे याचे विवेचन असावे. हा उपक्रम राबवत
असताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, यातून प्राप्त झालेले निष्कर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ करणारे आहे त. याचा समावेश यामध्ये असावा.
संदर्भ साहित्य देताना या उपक्रमासाठी साठी कोणते संदर्भ साहित्य वापरले याची यादी द्यावी.
परिशिष्टे व अभिलेखेयामध्ये उपक्रमाचे पुरावे,
सहभाग
विद्यार्थी, उपक्रमाशी संबंधित फोटो, बातम्या, पूर्वचाचणी अंतिम चाचणी निकाल गोषवारा इत्यादीचा समावेश
करता येईल.
याचे लेखन सविस्तर व मुद्देसूद असावे. अहवाल लेखनाबाबतच्या सूचना ह्या या स्पर्धेच्या माहितीपत्रकात सविस्तरपणे दिल्या आहेत. सहभागी स्पर्धकांनी त्या काळजीपूर्वक वाचून
त्याप्रमाणे अहवाल लेखन करावे.
प्रश्न - अहवाल लेखन करताना काय दक्षता घ्यावी ?
डॉ. बोरुडे
–नवोपक्रमाचा अहवाल आपणास मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिता येईल. अहवाल लेखनाची शब्दमर्यादा ५००० शब्दापर्यंत आहे, म्हणून पाच हजार शब्दापर्यंत पोहचण्यापेक्षा आपला नवोपक्रम सुस्पष्ट व मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न
करावा.अहवाल लेखन सुस्पष्ट व मुद्देसूद असावे उपक्रमाचे निष्कर्ष हे सुस्पष्ट
असावेत. नवोपक्रमाची
भाषा ही साधी, सोपी व प्रभावी असावी.नवोपक्रमाचे लेखन हे वाचकाला चटकन अवगत होईल असे
असावे.
शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवे करू पाहणाऱ्या
प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचावी हाच प्रमुख उद्देश या मुलाखती मागचा आहे.चला तर मग लागू या स्पर्धेच्या तयारीला....!!!.........
संपूर्ण
मुलाखत वाचायला विसरू नका उद्याच्या शिक्षक ध्येय अंका मध्ये ...
उद्याचा अंक वाचण्यासाठी आताच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/LJMbS6vcJxW6kWq46NbPC8