वाचायलाच हवे...
वाचाल तर विचार बदलतील, विचार बदलले तर स्वभाव
बदलेल, स्वभाव बदलला तर सवयी बदलतील, सवयी बदलल्या तर व्यक्तिमत्व बदलेल आणि
व्यक्तिमत्व बदलले तर भवितव्य घडेल, म्हणून नेहमी वाचन करावे. ~~ शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर
शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची.
आज आपण जागतिक पुस्तक दिन, वाचन प्रेरणा दिन, ग्रंथालय दिन, ग्रंथ दिंडी यासारखे
अनेक उपक्रम साजरे करतो तरी यामागील मुख्य उद्देश लक्षात येत नाही असे खेदाने नमूद
करावेसे वाटते.
थोर इतिहासकार गिबन म्हणाले होते, ‘देशातली सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी ओतली तरी माझे वाचनप्रेम मी सोडणार
नाही.’ पुस्तकांप्रती आपली सर्वांची अशीच श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आपल्या अवांतर वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते. आज उच्च पदाची नोकरी जे करीत आहेत त्यांच्या
जीवनात वाचनाचा फार मोठा वाटा आहे. हा वैचारिक,
आर्थिक, सामाजिक, सकारात्मक बदल फक्त वाचनामुळे घडून येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज अवांतर वाचन केलेच पाहिजे. वाचनामुळे
समुपदेशनाची, सल्ल्याची गरज पडत नाही. म्हणून दिशाहिन
झालेला समाज एकत्रित येऊ शकतो इतकी क्षमता वाचनामध्ये आहे.
शब्द आयुष्य घडवतात, बिघडवतात.
शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात,
शब्द नातं देतात, शब्द प्रेम देतात, शब्द आयुष्यभर आणि नंतरही मनामनात भावना जपतात. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. हे फक्त वाचनामुळे
शक्य होतं. आज डिजिटल तंत्रज्ञान आणि
सोशल मीडियाच्या प्रसारामध्ये आपण वाचन विसरलो आहे. उत्कृष्ठ, दर्जेदार साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे. पण आजची परिस्थिती फारशी
समाधानकारक नाही.
आजकाल लोकं काहीही वाचतात. बऱ्याच जणांना तर काय वाचावं हेही कळत नाही. पत्रकारांना - का, कधी, काय, कुठे, कसं, केव्हा, कोण असे प्रश्न शिकवले जातात. खरं तर हे प्रश्न सर्वांनाच पडायला हवे. वाचनाने एका नाण्याच्या दोन्ही बाजू आपणास कळतात. त्यातलं खरं काय नि खोटं काय? हे
आपल्यालाच आपल्या बुद्धीने ठरवता येतं आणि हे ठरवता आलं की आपण व्यक्त होतो.
सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःच्या विकासासाठी तरी ज्ञानार्जन, वाचन करावे... कारण आपण शिकलो, वाचते झालो तर समाज नक्कीच सुधरू आणि सुधारू शकतो...
भेट द्या www.shikshakdhyey.com
Comments
Post a Comment